मुख्य सामग्रीवर वगळा

सावरकरांची क्रांतिकारी उडी

ही अशी उडी बघताना । कर्तव्य मृत्यू विसरला ॥
बुरुजावर फडफडलेला । झाशीतील घोडा हसला ॥
वासुदेव बळवंतांच्या । कंठात हर्ष गदगदला ॥
क्रांतीच्या केतूवरला । अस्मान कडाडून गेला ॥
दुनियेत फक्त अाहेत । विख्यात बहाद्दर दोन ॥
जे गेले आईकरिता । सागरास पालांडुन ॥
हनुमानानंतर आहे । या 'विनायका'चा मान ॥
लावुनिया प्राण पणाला । अस्मान कडाडून गेला ॥


लोककवी मनमोहन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेच्या क्रांतिकारी उडीबद्दल लिहिलेल्या या ओळी आहेत.
या ओळींंची आज आठवण व्हायचे कारण म्हणजे आज ८ जुलै. आजच्याच दिवशी १९१० मध्ये सावरकरांनी ही जगविख्यात उडी घेतली होती. या घटनेला आज तब्बल १०८ वर्षे झालीत! या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघाले होते म्हणूनच या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. अपल्याकडचे काही जातीयवादी लोकं सोडलेत तर या उडीला जगभरातल्या इतिहासकारांनी महत्व दिले आहे. 
या उडीचे वर्णनच करायचे झाले तर 'मोरिया’ नौका मार्सेल्स (फ्रान्स) येथील धक्क्यावर उभी असताना सावरकरांंनी पोर्टहोलमधून उडी मारली. पोर्टहोलपासून समुद्रसपाटीची ऊंची होती तब्बल २७ फुट! उडी मारल्यानंतर सावरकर पडले समुद्राच्या खारट पाण्यात. आखुड पोर्टहोलमधून आपला ५.५ फुटांचा देह बाहेर काढताना झालेल्या जखमाना खारट पाण्याचा स्पर्श झाला असेल तेव्हा किती वेदना झाल्या असतील नाही! पाण्यात पडताच सावरकर पोहत पोहत आले ते बंदराच्या भिंतिपर्यंत, जी तब्बल ९ फुटांची होती. सावरकर ती निसरडी भिंत काही क्षणातच चढले यावरून त्यांच्या सामर्थ्याची कल्पना आपल्याला येईल! एकदा सावरकराना एका चिनी कैद्याने "आपण किती महिने पोहत होतात?" असे विचारले असता, "महिने कसले? पाच मिनिटंही पोहलो नसेल!" असे उत्तर सावरकरांनी दिले होते. मग या उडीला एवढे महत्त्व का प्राप्त आहे? तर या घटनेमुळे साम्राज्यवादी ब्रिटन आणि इतर देश हे समोरासमोर उभे ठाकले गेले हे आपल्याला तत्कालीन वृत्तपत्रांमधे आलेल्या वृत्तांमुळे समझते. ही इग्रजांची नाचक्की होती! या वृत्तांबद्दलचे सर्व संदर्भ डॉ. प. वि. वर्तकांच्या ‘सावरकर – चावट की वात्रट’ या पुस्तकात वाचकांना मिळतील. या पुस्तकात तत्कालीन ब्रिटिश आणि फ्रेंच वृत्तपत्रांंनी सावरकरांच्या उडीची कशी दखल घेतली होती हे आपल्याला या पुस्तकात दिलेल्या संदर्भांमुळे समजते.  ‘ल ह्युमनाईत’, ‘द प्रेझेन्स’, 'द डेली मेल' अशा अनेक वृत्तपत्रांनी या घटनेकडे एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून लक्ष दिले होते. "ब्रिटिशांंनी कायद्याची टवाळी केली", "फ्रेंच राज्यक्रांतिची प्रतारणा" अशा प्रकारचे वृत्त या वृत्तपत्रांनी छापले होते.
असे अनेक संदर्भ वर उल्लेेेख केलेल्या पुस्तकात आहेत. या घटनेनंतर भारतमंत्री लॉर्ड मोर्लेंना आपले पद गमवावे लागले होते! ही खुप मोठी गोष्ट होती. तर अशाप्रकारे या ऐतिहासिक घटनेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे.

तरीही सावरकर काय म्हणतात? तर - 

"तुम्ही माझी त्रैखंडात गाजलेली मार्सेची उडी विसरलात तर चालेल पण माझी जात्युच्छेदक अस्पृश्यता निवारक विज्ञानवादी विचारप्रणाली मात्र मुळीच विसरु नका."

दुर्दैव आपण दोन्हीही विसरलो! सावरकरांची उपेक्षा हा काही नवीन विषय नाही. ज्या माणसासमोर "भारतरत्न" हा पुरस्कारही खुजा वाटावा त्याचे तैलचित्र संसदेत लावताना विरोध होतो, एक जबाबदार केंद्रीय मंत्री सावरकरांनी लिहिलेल्या पंक्ति अंदमानच्या कारागृहातून काढून टाकतो, हे सर्व संतापजनक आहे. हे सर्व कमीच की, आजकाल उठसुठ कोणीही येतो आणि माध्यमांमधून सावरकरांंवर कुठलेही बिनबुडाचे आक्षेप घेतो. बर, सावरकर अभ्यासकांकडून वारंवार हे आक्षेप ससंदर्भ खोडून काढले जातात तरीही सावरकरांची बदनामी करण्याचे प्रयत्न थांबत नाहीत. कुठून  निर्माण होतो एवढा पराकोटिचा द्वेष? 

पण शेवटी सूर्यच तो, त्याला झाकण्याचे कितीही प्रयत्न केले तरीही सारे आसमंत प्रकाशित करणारा. सावरकर आणि त्यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी आहेत. ते आपल्याला नेहमीच योग्य ती दिशा दाखवतील आणि सावरकर नेहमीच करोडो भारतीयांसाठी आदरणीय राहतील !!



x

टिप्पण्या