मुख्य सामग्रीवर वगळा

पराभवाचा दोष द्यावा कुणाला?

सध्या संपूर्ण जगात  फुटबॉल वर्ल्ड कप ची चर्चा आहे! स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच मेसी आणि रोनाल्डो या दिग्गजांची चर्चा सर्वत्र होती! कदाचित हे त्यांचे शेवटचे wc असेल. म्हणून त्यांच्याकडून अपेक्षाही तेवढ्याच होत्या. पण साखळी सामान्यातुन कशीबशी पुढे गेलेली अर्जेंटीना शेवटी फ्रांस सोबतच्या लढतीत पराभूत झाली आणि बाहेर झाली. पुढे उरुग्वे समोर पोर्तुगालचाही तोच निकाल लागला. या निकालांची कारणे अनेक होती पण शेवटी   प्रसारमाध्यमे व सोशल मिडियात प्रश्नचिन्ह उभे राहीले ते मेसी आणि रोनाल्डोवर! आणि काही विचार मनात आले!

मी फुटबॉल क्वचित बघतो. म्हणून सबंधित विषय मी क्रिकेटशी जोडू पाहत आहे!


भारतात क्रिकेटची लोकप्रियता जबरदस्त आहे. कारणे अनेक असतील मात्र याचा परिणाम भारतात चांगले खेळाडू तयार होण्यात झाला. आजवर एकापेक्षा एक चांगले खेळाडू भारताने क्रिकेटला दिलेत. गावस्कर पासून ते कोहली पर्यन्त आणि कपिल देव पासून ते धोनी पर्यंत ही एक मोठी यादी आहे. सचिन हा तर भारताने क्रिकेटला दिलेला "देव"च! चाहत्यांनी त्याला बहाल केलेलं हे देवत्व! सचिन हा ग्रेटेस्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो हे नव्याने सांगायला नको!  मोठा खेळाडू म्हणजे, जेवढी मोठी स्पर्धा तेवढी मोठी कामगिरी करून दाखवणारा. आणि तेवढेच मोठे अपेक्षांचे ओझे वाहणारा! अशा दबावात ज्याची प्रतिभा खुलून निघते तो एक चांगला खेळाडू म्हणून गणला जातो. सचिन अवघड परिस्तिथिमध्ये नेहमीच चांगला खेळालाय. मग टेस्ट असो किंवा वनडे. सचिनने SCG वर केलेले 241 हे त्याचे एक उदाहरण. 2004 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो वारंवार अपयशी ठरत होता. शेवटच्या सामन्यात त्याला काहीतरी असामान्य करावे लागणार होते. आणि त्याने केलेही तसेच! एकही कव्हर ड्राइव किंवा ऑफला एकही चुकीचा शॉट न मारता केलेल्या या धावा, त्याची passion दखवतात! आणि जेव्हा गोष्ट "वर्ल्ड कप" ची असते तेव्हा सचिन आपल्याला त्याचा बेस्ट खेळ करतानाच दिसतो. (वर्ल्ड कप हे सचिन साठी खासंच होते!) 96 आणि 2003 या दोनही वर्ल्ड कप्स मध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. शिवाय wc मध्ये सर्वात जास्त शतके ही त्याने केलेली आहेत! पण तरीही महत्वाच्या सामन्यात स्वस्तात बाद होतो, म्हणून त्याच्या ग्रेटनेस वर नेहमीच लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले! सचिन दबाव सहन करु शकत नाही असा आरोप तर नेहमीच होतो. त्यातून त्याची तुलना दुसऱ्या समकालीन आणि वर्तमान चांगल्या खेळाडूंबरोबर नेहमीच केली गेली! येथे आपण एक गोष्ट समजावून घेतली पाहिजे ती म्हणजे क्रिकेट हा सांघित खेळ आहे. येथे चांगल्या गोलंदाजांना चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज असते. आणि चांगल्या फलंदाजांच्या जोडीला चांगले गोलंदाज असावे लागतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रिकी पॉन्टिंग च्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया! एकसे बढकर एक फलंदाज त्यांच्या कडे होते, परंतु कधी पॉन्टिंग ला अपेक्षांचे ओझे वाहताना पाहिले नाही. जेव्हा कोणताच फलंदाज चालायचा नाही तेव्हा मायकल बेवन हारलेले सामने खेचुन आणायचा, फिनिशर म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती. आणि जेव्हा कुठलाच फलंदाज चालायचा नाही तेव्हा? तेव्हा त्यांच्याकडे शेन वॉर्न हा तुरुप चा एक्का होता! दोन wc जिंकलेली वेस्टइंडीज ची टीम काही वेगळी नव्हती. ती एक परिपूर्ण अशी परफेक्ट टीम होती. या दोनही संघाचे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे ते अतापर्यंतच्या सर्वात यशस्वी संघ आहेत! कारण एकच- एक "संघ" म्हणून ते उत्कृष्ट होते! आपण 1983 आणि 2011 ला wc जिंकलो तेव्हाही आपली संघ म्हणून कामगिरी दमदार होती! त्यानंतर 2003 ला जेव्हा आपली टीम अंतिम सामान्या पर्यन्त गेली तेव्हाही आपली "टीम" सर्वोत्कृष्ट खेळ करत होती. ती टीम खऱ्या अर्थाने परिपूर्ण टीम होती. पण अंतिम सामन्यात आपण एक टीम म्हणून कुठेतरी कमी पडलो म्हणून हरलो! तरीही खापर बऱ्याच अंशी सचिनवर फोडले गेले. आपल्या संघाने जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी केली आहे तेव्हा तेव्हा तो एक परफेक्ट टीम परफॉर्मन्स म्हणून गणला गेलाय! जगातल्या कुठल्याही टीम बाबतीत हेच सिद्ध होते! त्यामुळे एका व्यक्तिवर जिंकण्याचे संपूर्ण श्रेय किंवा पराभवाचा दोष देणे आपण नेहमीच टाळले पाहिजे! खेळाशी आणि व्यक्तिंशी चाहते ज्याप्रकारे भावनिक जोडले गेले आहेत, तेथे आपण ही तटस्थ भूमिकेची अपेक्षा करणे काहींना कदाचित जास्त वाटू शकते. पण अशी भूमिका घेणे हा एक चांगला प्रेक्षक आणि चाहता असायला गरजेचे आहे! खेळ कुठलाही असो, आपल्याला प्रेक्षकांचा हा उथळपणा दिसून येतो. 

चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूकडून अपेक्षा असणे काहीच गैर नाही. मात्र सांघिक खेळात विजय आणि पराभव एका खेळाडूवर कधीच अवलंबून नसतात हे आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे!!

टिप्पण्या