मुख्य सामग्रीवर वगळा

जोकर....

आतापर्यंत जगात जेवढ्या खलनायकी पात्रांची निर्मिती झाली त्यात निःसंशय पणे डीसी कॉमिक्सचे जोकर हे पात्र सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर आपण रोजच जोकरशी निगडित एखादी पोस्ट किंवा त्याचे क्योट्स बघत असू. जोकर हा पॉप कल्चरचा अविभाज्य घटक बनलाय.
खलनायक कसा असावा तर जोकर सारखा. ज्याच्याशी लढताना केवळ शारिरीकच नव्हे तर मानसिक पातळी वर सुद्धा बॅटमॅन सारख्या सुपरहिरोची दमछाक होईल असा सुपर व्हिलन म्हणजे जोकर. जोकर चे पात्र प्रेक्षकांना सुद्धा विचार करायला भाग पाडते. जोकर तुमच्या विवेकाशी खेळतो अक्षरशः! हे प्रामुख्याने अधोरेखित केले ते 'द' नोलान च्या 'द डार्क नाईट' या चित्रपटाने.
मराठीत जसं नटसम्राट ची भूमिका करणे प्रतिभावंताचे काम मानले जाते, तसेच काही जोकरचे आहे. जोकरच्या पात्राला न्याय देणे हे अभिनेत्यासाठी जिकरीचे काम आहे. आतापर्यंत चार वेगवेगळ्या कलाकारांनी  मोठ्या पडद्यावर जोकर साकारलाय. जॅक निकोल्सन (बॅटमॅन 1989), हिथ लेजर (द डार्क नाईट), जेराड लेटो (Suicide Squad), वाँँकिन फिनिक्स (जोकर 2019). येथे विशेष उल्लेख करावा लागेल मार्क हॅमिलचा! त्याने ऍनिमेटेड जोकरला आवाज दिलाय. त्याने आवाजातून साकारलेला जोकर हा इतका परफेक्ट आहे की जोकर (हॅमिल)  जेव्हा हसतो तेव्हा त्याचं ते भेसूर असुरी हास्य अंगावर काटा उभा केल्याशिवाय राहत नाही.
  जॅक निकोल्सन सारख्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्याने जोकरचं काम केलंय यावरूनच या पात्राची खोली आपल्याला कळू शकते. निकोल्सनचा जोकर हा बॅटमॅनला आणि प्रेक्षकांना मानसिक पातळीवर जाऊन खेळवत नाही. तो टिपिकल ट्रिक्स आणि प्रांक्स करणारा जोकर आहे. पण निकोल्सनने निःसंशयपणे जबरदस्त काम केलंय यात शंकाच नाही.
नोलान आता बॅटमॅन बिगिन्स च्या पुढचा भाग बनवणार आहे आणि त्यात जोकर असणार आहे हे समजताच आता कोण निकोल्सनच्या पाऊलावर चालणार याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. नोलानने हिथ लेजरला निवडलंय हे कळाल्यावर प्रसार माध्यमांनी आणि फॅन्सनी शंका उपस्थित केली होती हे आज सांगितलं तर किती नवल वाटेल नाही! आज जोकरचं पात्र ज्या काही उंचीवर नेऊन ठेवलंय ते याच हिथ लेजर ने. जोकर म्हणजे लेजर आणि लेजर म्हणजे जोकर असं समीकरण द डार्क नाईट नंतर झालं. आजही सोशल मीडियावर या जोकरचे क्योट्स शेयर केले जातात, आणि अजून बरीच दशके हा जोकर कोणी विसरणार नाही. याचे श्रेय ख्रिस्तोफर नोलान या जिनियसलाही तेवढेच आहे. जोकर हा वाईट आहे क्रिमिनल आहे, पण "Joker makes sense" असं जेव्हा प्रेक्षक म्हणतात तेव्हा जोकर हा आपल्या विवेकाशी कसं खेळलाय हे लक्षात येते! याचे संपूर्ण श्रेय नोलानलाच!! 
मध्यंतरी जेराड लेटोला Suicide Squad मध्ये जोकर साकारण्याची संधी मिळाली. हा जोकर आणि त्याचे काम प्रेक्षकांना फारसे आवडले नाही. लेटो चांगला अभिनेता आहे पण दिगदर्शकालाच त्याच्याकडून काम वठवून घेता आले नाही असेही म्हणता येईल.
'जोकर' वर एक सोलो चित्रपट येणार आहे आणि त्यात वाँँकिन फिनिक्स  ती भूमिका साकारणार आहे हे समजल्यावर माझा उत्साह वाढला होता. कारण फिनिक्स गेली काही वर्षे खूपच जबरदस्त काम करतोय आणि तो जोकरला नक्कीच न्याय देईल असे मला वाटले, आणि त्याने दिला! तो लेजरच्या पंक्तीत जाऊन बसलाय यात शंकाच नाही! त्याने या पात्राला इतकं दिलंय की चित्रपट पाहताना कधी कधी त्याच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याची काळजी वाटायची. 'द डार्क ..' च्या जोकर प्रमाणेच हा जोकर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतो, की जोकर खरंच वाईट आहे काय? जोकर तर व्यवस्थेचा बळी आहे म्हणून तो असा आहे! हेच या चित्रपटाचं यश आहे. खरतर 'जोकर' ही मला आर्थर ची कथा जास्त वाटते, आर्थर जोकर कसा झाला याची कथा, जोकरची 'ओरिजिन स्टोरी' आहे. त्यामुळे फिनिक्सच्या जोकरची आणि लेजरच्या जोकरची तुलना होऊ शकत नाही. 

बॅटमॅन विरुद्ध जोकर


वर सांगितल्या प्रमाणे जोकर आपल्या विवेकाशी खेळतो. आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतो, जोकर खरंच वाईट आहे काय? की तो व्यवस्थेचा बळी आहे? म्हणूनच मग "Joker makes sense" असं आपल्याला वाटू लागतं. पण नाही. जोकर वाईटच आहे. त्याला लोकांना मारायला मजा वाटते. होय, तो व्यवस्थेचा बळी आहे. पण बॅटमॅन सुद्धा व्यवस्थेचाच बळी आहे नाही काय? या व्यवस्थेशीच दोन हात करायलाच तर तो 'बॅटमॅन' बनलाय नाही का? बॅटमॅनने त्याचा मार्ग निवडलाय विजेलांटी बनून गुन्हेगारीशी दोन हात करायचा आणि जोकर ने त्याचा - जोकरला फक्त जग जळताना पाहायचंय!!

टिप्पण्या