मुख्य सामग्रीवर वगळा

परिवर्तनवादी डॉ बाबासाहेब आंबेडकर.

लाखों वर्षापूर्वी मानव हा प्राणी अस्तित्वात आला तेव्हापासून ते आज एकविसव्या शतकापर्यंत अनेक सामाजिक प्रवाह रुजू झाले आणि मोडीतही निघाले. मानव मुळता सामाजिक असल्याकारणाने हे साहजिक होते. हे प्रावाह रुजू होताना नेहमीच समाजात प्रबळ असलेल्या घटकांना अनुसरूनच रुजू झाले. त्यामुळेच राजकीय आणि धार्मिक प्राबल्य स्वतःकडे असणे प्रत्येक वर्गाला (एकाच विचाराच्या लोकांना) गरजेचे वाटू लागले. म्हणून मिळवलेली सत्ता आणि धार्मिक श्रेष्ठत्व टिकवणे ज्या त्या वर्गासाठी महत्वाचे होते. पृथ्वीवर खंड, भाषा, प्रांत ह्या गोष्टी विभिन्न असल्या तरी मानवाच्या "मुळ मानवीय संकल्पना" ह्या एकसारख्याच असतात. म्हणूनच मध्ययुगीन काळात युरोपात सामंतशाही, अमेरिकेत मुळ अमेरिकी लोकांवर वसाहतींचे असलेले वर्चस्व, आफ्रिकेतील वंशवाद आणि भारतातील वर्णव्यवस्था हे सर्वच अमानुष प्रवाह रुजू होते. समस्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातून उद्भवणारी अमानुष समाज व्यवस्था ही सारखीच भयंकर होती.


निसर्गात असलेले प्रवाह उलथुन टाकायला निसर्ग स्वतः खंबीर असतो.मार्गात आलेले डोंगर-पर्वत पोखरुन पुढे जाण्याचे सामर्थ्य निसर्गाने नदीला दिलेले असते. अशाच प्रकारे अमानुष मानवीय प्रवाह उलथुन टाकण्यासाठी आणि लाखों लोकांना दीपस्तंभासारखा योग्य मार्ग दाखवण्यासाठी कुण्या सामर्थ्यवान "महामानवालाच" जन्म घ्यावा लागतो. भारतातील अशाच अमानुष सामाजिक व्यवस्थेला  उलथुन टाकले ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी! पिढ्यांपिढ्या शोषिक-वंचित असलेल्यांचे ते मसिहा झाले असं म्हणता येइल. परिवर्तन आणि मानवाला मानवासारखी वागणूक देण्याच्या आपल्या मुळ सिद्धांतांवर ते समानतेसाठी आयुष्यभर झगडले नाही तर लढले आणि जिंकले सुद्धा.



हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात त्याच प्रमाणे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचेही अनेक पैलू होते. बाबासाहेब समाजसुधारक होते, समाजातील शोषिकांचे ते आधार होते, नेते होते! एवढेच नव्हे तर बाबासाहेब अर्थतज्ञ होते,विचारवंत होते,उत्तम लेखक होते. त्यांच्या "Buddha and his Dhamma" हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला जाणवेल की त्यांचा इतिहासाचा अभ्यासही तगड़ा होता. माणूस एकच पण व्यक्तिमत्वाचे पैलू अनेक! कुणालाही हेवा वाटेल अशेच होते बाबासाहेब.



बाबासाहेबांच्या अशा अनेक पैलूंपैकी मला भावलेला माझ्या मनात रुजलेला पैलू म्हणजे त्यांचा परिवर्तनवाद! त्यांनी लोकांच्या मनात घडवलेली क्रांति! बाबासाहेबांचे शिक्षण पाहिले की आपल्या लक्षात येइल ते सहज विदेशात राहून लठ्ठ पगाराची नोकरी करु शकत होते. पण हे त्यांना मान्य नव्हते. त्यांना आपल्या लोकांत, आपल्या देशात, आपल्या समाजात बदल घडवायचा होता. परिवर्तन घडवायचे होते. दलित समाजाला मुख्य प्रावाहत आणून समानता आणायची होती आणि सवर्णांनाही याची गरज भासवुन द्यायची होती.त्यांना जनसामान्यांच्या काळजात क्रांतीची ज्योत पेटवायची होती. पण हे सर्व कधी घडले तर तब्बल ७०-७५ वर्षांपूर्वी. म्हणजे बाबासाहेब त्यांच्या काळाच्या किमान ५ दशके पुढे होते.



पण खरच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आपला समाज प्रगत झाला आहे काय? याचे उत्तर नक्कीच "नाही" असे आहे! जातीच्या जोखडाने आपल्या असं घट्ट पकड़लय की बाबासाहेबांचे विचार आपण विसरून चाललो आहोत. प्रत्येक महापुरुषाची जातीत विभागणी करून आपण अजुन मागासले गेलो आहोत. आंबेडकर कोणाचे दलितांचे. सावरकर कोणाचे ब्राम्हणांचे, फुले माळींचे.असं अगदी सहज विभागणी करून टाकली आहे आपण महापुरुषांची. बाबासाहेबांना हे कधीच अभिप्रेत नव्हते! आपण त्यांच्याकडून योग्य ती प्रेरणा कधीच घेतली नाही.राजकारणा साठी तेवढा त्यांचा उपयोग करून घेतला. खरचं आपण एवढे बुरसटलेले आहोत का? जर नाही तरी आजही जात बघून उमेदवार का उभा केला जातो? जातपंचायती का आहेत? कारण आपण अजूनही त्या जुनाट संकल्पनांमध्येच अडकून पडलो आहोत! बाबासाहेबांचा परिवर्तनवाद आपण कधी आत्मसात केलाच नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही आपण ह्या सर्व समस्यांवर मार्ग काढू शकतो. आणि त्या सोडवूही शकतो. गरज आहे ती फक्त सर्व महापुरुषांच्या विचारांतुन प्रेरणा घेण्याची. प्रत्येक बाबतीत. व्ययक्तिक बाबींपासून ते राजकीय आणि सामाजिक बाबींपर्यंत. बाबासाहेबांनाही हेच अपेक्षित असेल. इथून आणि अगदी इथूनच आपण सुरुवात केली तरच पूर्ण राष्ट्राने पाहिलेल "महासत्ता" होण्याचं स्वप्न आपण साकारु शकू !!!



जय भीम.

टिप्पण्या