मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय प्रसारमाध्यमे : एक निरीक्षण

2014 च्या लोकसभा निवडणुकांनी भारतीय राजकारण कायमचेच बदलून टाकले. एक विचारसरणीकडून राजकीय दृष्ट्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या गोष्टी मुख्य प्रावाहात आल्या. सेक्युलॅरिसम् ची जागा आता नॅशनॅलिसम् ने घेतली आहे. 'वोट बँकेचे' राजकारण हळूहळू लोप पावत चालले आहे. याबरोबर आणखीन बऱ्याच गोष्टी बदलल्या. मग लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला म्हणतात तो मीडिया बदलणार नाही कशावरून? 2014 नंतर देशातील मीडियाचे सरळ दोन गटच तयार झाले.

एका गटाने उजवा हात पकडला तर दुसरा गट जो आधीच डावीकडे होता, असे मीडियाचे विभाजन झाले. पण आजही सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांवर वर्चस्व आहे ते डाव्या गटाचेच. उजवा गट कधी अस्तित्वातच नव्हता असं नाही, पण मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचणे त्यांना जमले नाही. (की जमू दिले नाही?) 2014 नंतर मात्र तथाकथित 'मेनस्ट्रीम' माध्यमांमध्ये असा 'उजवा' गट तयार झाला. शिवाय सोशल मीडिया हे सर्वच विचारांच्या लोकांना खुले असल्यामुळे येथेही बरेच डावे विरोधी पत्रकार, वेब पोर्टल्स तयार झाले. यामुळे पत्रकारितेचा ठेका घेतलेल्यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार हे नक्की होते. आतापर्यंत आम्ही सांगू आणि दाखवू तेच सत्य असं मानणाऱ्याना लोकं जेव्हा प्रश्न विचारू लागले तेव्हा आमचा 'आवाज दाबला जातोय' हे त्यांच्या लक्षात आले! 

एक महाशय तर टीव्ही बघू नका असं सांगतात, पण रोज रात्री टीव्हीवर येऊन आपल्या विरोधी विचारांच्या माध्यमांना 'गोदी मीडिया' म्हणून हिणवतात. का? तर त्यांना जे वाटतं त्यांच्या विचारांना जे पटत नाही ते बाकीचे दाखवतात म्हणून!

एखादी बातमी सांगताना किंवा मुद्दा मांडताना साधारणता अगोदर तथ्य (facts) मांडले जातात, नंतर कथन (narrative) आणि मग काढतात तो निष्कर्ष. पण आपल्याकडे वृत्त वाहिन्या, वृत्तपत्रे, तथाकथित बुद्धिमान लोकं, उलटंच करताना दिसतात. आधीच narrative तयार करून निष्कर्ष काढून मोकळे होतात, तथ्य कुठे नसतातच, पुरावे तर लांबच! एक काळ होता तथाकथित बुद्धिमान पत्रकारांना/विचारवंतांना प्रश्न कोणी विचारतंच नव्हतं. त्यामुळे आपण जे सांगू , लिहू तेच अंतिम सत्य असा त्यांचा समज होता. पण काळ बदलला, सामान्य लोकांच्या हाती 'सोशल मिडिया' नावाचं आपलं मत मांडण्याचं साधन उपलब्ध झालं. मग लोकं या बुद्धिमान मंडळींंनी केलेल्या कथनावर/ दाव्यावर प्रश्न विचारु लागले! तर्क मांडू लागले, तथ्य आणि पुराव्यांचा भडिमार करु लागले! या सामान्य लोकांना उत्तर देणे सोडून त्यांनाच 'ट्रोल' किंवा 'भक्त' म्हणणे या बुद्धिजीवींनी सुरु केले! तरीही लोकं थांबत नाही म्हंटल्यावर या बुद्धिजीवींनी 'विक्टिम' कार्ड काढले. मग 'लोकशाही' कशी धोक्यात आहे, संविधान कसे वाचवले पाहिजे आणि ही तर 'अघोषित आणिबाणी' आहे पर्यंतच्या घोषणा देऊ लागले! तुम्ही साधारणता आणिबाणी पाहिलेल्या कोणत्याही निष्पक्ष पत्रकाराचे मत पहा, तो आजची तुलना आणिबानीशी कधीही करणार नाही! बद्धिजीवींना प्रश्न विचारणे किंवा तथ्य मांडून खोटे ठरवणे आणिबाणी आहे का? या लोकांनी अश्या सर्व शब्दांना इतकं हलकं करून टाकलंय की त्याची तीव्रताच कमी करून टाकली. 'डर का माहौल है' असं जेव्हा हे लोकं म्हणतात तेव्हा त्यांच्यासाठी ते खरेच असते, ते घाबरतात तथ्यांना, तर्कांंना आणि सामान्य लोकांच्या प्रश्नांना! 'हम सवाल पूछेंगे' असं म्हणताना ते हे मात्र विसरून जातात की प्रश्न विचारणे हा काही वन वे रोड नाही, लोकं आपल्याकडे सुद्धा तथ्य, पुरावे मागतिल!

टिप्पण्या