मुख्य सामग्रीवर वगळा

राजकीय इकोसिस्टम...

 सध्या फेसबुकवर राजकीय/वैचारिक इकोसिस्टम विषयी चर्चा चालू आहे. महाराष्ट्रातील मातब्बर राजकारणी श्री शरद पवार यांची इकोसिस्टम किती प्रभावी आहे आणि सत्ता असो वा नसो ते त्या यंत्रणेचा कसा फायदा करून घेतात आणि हिंदुत्ववादी भाजपला अशी राजकीय सामाजिक वैचारिक इकोसिस्टम का उभी करता आली नाही अशा आशयाची ही चर्चा आहे. 

"अशा इकोसिस्टमची गरजच काय?" "RSS ची यंत्रणा आहे ना!" "...मग पवार साहेबांचे 4 च खाजदार का निवडून येतात?" ... अशा प्रकारचे मतप्रदर्शन काही भाजप समर्थकांनी केले.

खरंतर या विषयावर बोलताना आपल्याला हे समजून घेता आले पाहिजे की ही यंत्रणा 'वैचारिक' आहे. इथे एकाच विचाराचे पत्रकार, लेखक, विचारवंत, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र आले आहेत. आणि तो विचार 'डावा' आहे हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात या यंत्रणेला आपण लेफ्ट इकोसिस्टम म्हंटल तरी हरकत नसावी. 

शरद पवार हे या इकोसिस्टमचा एक भाग आहेत. हे मान्यच की महाराष्ट्रात ही यंत्रणा उभी करण्यात त्यांचं योगदान आहे. पण काँग्रेस सुद्धा त्याच विचारांची असल्यामुळे आणि पर्यायाने तीच इकोसिस्टम शेयर करत असल्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीला पाहिजे तसं यश 'आकड्यांच्या' स्वरूपात मिळाले नाही असं ही आपल्याला म्हणता येईल. पण आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीची जेवढी पकड आहे तेवढी कुठल्याच पक्षाची नाही हे ही त्याच यंत्रणेचे श्रेय आहे.

यावर एक मुद्दा वारंवार उपस्थित होतो की ही इकोसिस्टम फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही तर सत्तेत नसताना आपल्याला वाटेल ते साध्य करण्यासाठी असते. हे अत्यंत खरं आहे. परंतु हेही आपल्याला लक्षात घेतले पाहिजे की अशी यंत्रणा बळकट करण्यासाठी सत्तेची नितांत गरज असते. पवार साहेब  वर्षानुवर्षे सत्तेत असल्यामुळे किंवा सत्तेचा भाग असल्यामुळेच  ही इकोसिस्टम एवढी मोठी झाली आहे.

आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण फडणवीसांनी ही यंत्रणा हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला हे माझे निरीक्षण आहे. उदा. त्यांच्यामुळे भाजपमध्ये झालेली इनकमिंग, त्यांनी विरोधी विचारांच्या पत्रकारांना दाखवलेली आपुलकी, भाजपला ग्रामीण भागात पोहचवण्याचा प्रयत्न. ते पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत हेच खरे. त्यांना सत्ता टिकवता आली नाही म्हणून? की त्यांची योजनाच चुकुची होती? असो... माझे निरीक्षण चुकीचे देखील असू शकते.


हिंदुत्ववाद्यांची अशी कोणती यंत्रणा कार्यरत आहे का?

याचं उत्तर होय असंच आहे. महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या.. इथे हिंदुत्ववादी विचारांचे पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते नाहीत काय? उद्योजक नाहीत काय? तर आहेत.. अगदी सामान्यांनात लोकप्रिय असलेले कलावंत देखील आहेत. RSS शी संलग्न अशे लोकं प्रत्येक क्षेत्रात आहेत. हिंदुत्ववाद्यांचे सरकार असताना आशा लोकांचा यथोचित सन्मान देखील झालाय. पण ही सिस्टम कधी मेनस्ट्रीम झाली नाही हेही खरेच... सत्ता दीर्घकाळ न मिळाल्यामुळे का? 

एक छोटेशे उदा द्यावेशे वाटते ते असे की, सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे चालू आहे. त्याला प्रतिउत्तर देण्यात सावरकर अभ्यासक नेहमीच पुढे सरसावले आहेत. आज बरीच तरुण मंडळीही सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या विचारांचा प्रचार प्रसार करत आहेत. हे वर्षानुवर्षे असलेल्या एका प्रतिकूल वातावरणात (इकोसिस्टममध्ये) एखादी सिस्टम कार्यरत असल्याशिवाय शक्य आहे काय?

मागे महाराष्ट्रातील एका वृत्त वाहिनीने सावरकरांच्या जयंतीदिवशी आक्षेपार्ह कार्यक्रम घेतला. त्याला सर्वच थरांतून जोरदार विरोध झाला. शेवटी मराठी उद्योजकांनी त्या वाहिनीवर आपल्या जाहिराती बंद केल्या.. आणि त्या वहिनीला माफी मागण्यास भाग पाडले. हे छोटेशेच पण महत्वाचे उदाहरण आहे!

RSS च्या समाजकार्याचे जाळे देशभर पसरलेले आहेत. दुर्गम आदिवासी भागात कित्येक स्वयंसेवक कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक संस्था विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. हे 'इकोसिस्टम' निर्माण करण्याचे प्रयत्न नाहीत काय?


तथाकथित इकोसिस्टममधील मीडियाचा वाटा!

मोठमोठे विचारवंत, लेखक, कलाकार हे अप्रत्यक्षपणे लोकांवर प्रभाव टाकत असतातच पण त्यांचे काय मत आहे याच्याशी सामान्यांना फारसं काही घेणं देणं नसतं. सामान्य लोकांवर प्रभाव टाकतात ते प्रसार माध्यमे! आजही एक खूप मोठा वर्ग टीव्ही वरच्या एकांगी चर्चा (खास करून मराठी मीडियाच्या) पाहतो आणि वृत्तपत्रातील अग्रलेख आवर्जून वाचतो. प्रसार माध्यमांमध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांचा भरणा असल्यामुळे आपच त्याचा प्रभाव पडतो. 2014 नंतर ई मीडियामध्ये हिंदीत आणि इंग्रजीत उजव्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. तसेच सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन इंग्रजी आणि हिंदी मध्ये बरेच डावे वेब पोर्टल्स उदयास आले. (उदा. - द वायर, क्विंट, द प्रिंट इत्यादी) त्याला उत्तर म्हणून opIndia, Swarajya हे उजवे पोर्टल्सही निर्माण झाले, त्यांचे कार्य दखल घेण्यासारखे आहे! युट्युब वरही डावे-उजवे दोन्ही बाजूचे लोक आहेतच! 

पण तरीही इकोसिस्टमसाठी महत्वाच्या असलेल्या मीडियामध्ये हिंदुत्ववाद्यांना अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे.


मराठी मीडिया : 

हिंदी किंवा इंग्रजी मध्ये उजव्यांना जे काही थोडंफार स्थान मिळालंय ते मराठीत अजिबात नाही. महाराष्ट्रात हिंदुत्ववाद्याना मीडियामध्ये दखल घेण्याइतपत अस्तित्वच नाही हे कटू सत्य आहे. एकांगी वृत्तांकन करायचे, रोजच्या चर्चेत एकाच विचाराच्या चार पाच लोकांना बोलवायचे आणि एका हिंदुत्ववाद्याला झोडपून काढायचे हे वर्षानुवर्षे चालू आहे. महाराष्ट्रातील तमाम प्रसार माध्यमांनी भाजप विरोधी असण्याचा चंगच बांधलाय! सोशल मीडियावर प्रस्थापित वृत्तवाहिन्यांचे वेब पोर्टल्स बातमीचा मथळा कशा प्रकारे देतात यावरून आपल्याला हे लक्षात येईल. 

"अमुक अमुक झाले.. फडणवीसांना दणका" हे जोक्स ही याच कारणामुळे गाजले. काहीही झालं तरी "भाजपला धक्का" हे त्यांचे ठरलेले असते. एखाद्या हिंदुत्ववाद्याने पाकिस्तान बद्दल केलेले विधानही त्यांच्यासाठी "वादग्रस्त" असते तर भाजप विरोधींनी केलेले काळे कारनामे दखल घेण्यापात्रही त्यांच्यासाठी नसतात! या वरून मराठी मीडियाने आपली विश्वासार्हता गमावली आहेच, त्यांचे समर्थन होऊच शकत नाही, पण हे असे का आहे याचा विचार हिंदुत्ववाद्यांना करणे अत्यंत गरजेचे आहे!!


शेवटी एव्हढचं की केवळ भारत नव्हे तर जगभर डाव्यांची प्रभावी अशी इकोसिस्टम कार्यरत आहे. सत्तेत असो वा नसो ही यंत्रणा आपल्याला पाहिजे ते करवून घेत असते. कित्येक वेळा ही यंत्रणा निवडणुका आणि बऱ्याच गोष्टी manipulate देखील करत असते. पण म्हणून उजव्यांची अशी कोणती यंत्रणाच अस्तित्वात नाही हे म्हणणे चुकीचे आहे.


भारतात देखील उजव्यांची म्हणजेच हिंदुत्ववाद्यांची अशी एक यंत्रणा आहे. पण ती डाव्यांएवढी प्रभावी नाही हे खरे आहे. वर्षानुवर्षे सत्तेपासून लांब राहिल्यामुळे असे आहे का? की हिंदुत्ववादी खरंच कुठे कमी पडले? उत्तर तर येणारा काळच देईल!

टिप्पण्या